इस्लामाबाद:
पाकिस्तानच्या बलुचिस्तान राज्यात रात्री उशिरा पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याची कारवाई झाली आहे. या कारवाईत मस्तुंग, पंजगुर आणि केच जिल्ह्यांमध्ये आठ नागरिकांना जबरदस्तीने त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण बलुचिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.
बलुचिस्तान पोस्टनुसार मस्तुंगमधील करेजसोर तहसीलमधून असीम फारुक यांना रात्री १ वाजता त्यांच्या घरातून नेण्यात आले. खड्डकुचा तहसीलमधून मोहम्मद वफा, आणि किल्ली कुनगढ येथून खलील अहमद यांचंही अपहरण झालं. किल्ली अजीजाबाद भागातून औरंगजेब शाही आणि लेवी कॉन्स्टेबल गुलाम जान यांच्यावर छापे टाकून त्यांना बेपत्ता करण्यात आलं.
केच जिल्ह्यातील दश्त परिसरातून मुराद खान आणि राशिद यांना तर पंजगूरच्या पारोम भागातून शहजाद यांना सैनिकांनी ताब्यात घेतलं आहे.
या कारवाईविरोधात बलुच यकजेहती समिती व बलुच महिला फोरमने तीव्र निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. या घटनांमुळे स्थानिक जनतेत भीतीचं वातावरण पसरलं आहे.





