कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकरानेच चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने तरुणीच्या बरगडीत चाकू खुपसून दरवाजाला कडी लावली आणि तिला तडफडून मरू दिलं.
मृत तरुणीचं नाव समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असं असून, आरोपीचा नाव सतीश यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आहे. दोघंही गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीसह एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही सुरू केली होती.
प्रेमात नकार; खूनाचा निर्णय
सतीश यादव याने समीक्षाकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, समीक्षाने त्याला नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या सतीशने मंगळवारी दुपारी तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. चाकूचा घाव इतका जबरदस्त होता की ती जागीच मृत्युमुखी पडली. हल्ला करून झाल्यानंतर आरोपीने दरवाजाला कडी लावली आणि तिला मरू दिलं.
चार दिवसांपूर्वी वाद
घटनेच्या काही दिवस आधी सतीश आणि समीक्षामध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर समीक्षा आणि तिची मैत्रीण फ्लॅट सोडून गेल्या होत्या. मात्र, मंगळवारी ती परत आली आणि ही भयावह घटना घडली.
पोलीस तपास सुरू
सध्या पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सतीश हा फरार झाला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









