जळगाव | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखात झालेली चूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इगतपुरी-आमणे मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित प्रवास केला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बोलता बोलता एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
पण चूक लक्षात येताच अजित पवारांनी ती सुधारली आणि तात्काळ माफीही मागितली. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजित पवार अनेकदा भाषणात झालेल्या चुका जागेवरच सुधारतात आणि हीच बाब पुन्हा एकदा दिसून आली.
️ सत्तांतराचा गोंधळ?
सत्ताबदलानंतर अनेक वेळा जुने सवयीचे उल्लेख अनवधानाने होतात. याचेच उदाहरण या कार्यक्रमात पाहायला मिळाले. फडणवीसांसमोरच शिंदेंचा ‘मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख झाल्याने उपस्थितांमध्ये क्षणभर गोंधळ निर्माण झाला.
️ शिवसेना मंत्र्यांची नाराजी
या घटनेनंतर शिवसेनेतील काही मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मते, अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून शिवसेना मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी वाटप करत आहेत. याच कारणामुळे विकासकामे थांबली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
️ कॅबिनेटनंतर बैठक
या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये विकासकामांना निधी मिळत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला असून, सरकारमध्ये सर्व घटकांना समान अधिकार मिळावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
सामना अग्रलेखातून टोला
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोला लगावला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, “अजित पवार हे इतक्या अडचणीत आणत आहेत की भाजप आमदार अमित शहा यांच्याकडे गाऱ्हाणं घेऊन पोहोचले. शहा यांनीही ‘अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत’ असा सल्ला भाजप आमदारांना दिला.” यावरून महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरघोडी आणि संघर्ष स्पष्ट होत आहे.










