मुंबई | प्रतिनिधी
चर्चगेट रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. स्थानकातील मॉन्जिनिज केकशॉपमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असून, काही वेळासाठी एकच गोंधळ उडाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
सायंकाळच्या वेळेस प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्याचवेळी ही आग लागल्यामुळे स्टेशनच्या कॉरिडॉरमध्ये आणि भूयारी मार्गात धुराचे लोट दिसून आले. खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि संबंधित भाग तात्काळ बंद करण्यात आला.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काहीच वेळात आग विझवण्यात आली. मॉन्जिनिज केकशॉपमध्ये लागलेल्या आगीत दुकानातील वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, आग लागल्यामुळे चर्चगेट स्थानकाचा मुख्य रस्ता आणि प्रवेशद्वार काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आग नियंत्रणात आल्यानंतर गेट आणि मार्ग पुन्हा खुला करण्यात आला.
सकारात्मक बाब म्हणजे या घटनेचा लोकल सेवा आणि रेल्वे वेळापत्रकावर फारसा परिणाम झालेला नाही, ही बाब प्रवाशांसाठी दिलासादायक ठरली आहे.





