नाशिक | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे, पण ते समाजात दुधात साखरेसारखं काम करतात,” असे प्रतिपादन त्यांनी परशुराम भवनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
नाशिक येथे चित्पावन ब्राह्मण संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या परशुराम भवन आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाची आठवण करून दिली.
“स्वातंत्र्य चळवळ, कला, साहित्य, समाजसुधारणा अशा विविध क्षेत्रांत चित्पावन ब्राह्मण समाज अग्रस्थानी राहिला आहे. या क्षेत्रातील १० ठळक नावांमध्ये किमान ३-४ नावे या समाजातील असतात,” असं ते म्हणाले.
फडणवीस यांनी चित्पावन ब्राह्मण संघाच्या ९३ वर्षांपासून सुरु असलेल्या कार्याची प्रशंसा केली. “आपण समाजातील गरजूंसाठी हॉस्टेलची सोय केलीत, एनडीएसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देण्याचा उपक्रम हाती घेतला, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे,” असे ते म्हणाले.
राजकीय क्षेत्रात संख्येचं महत्त्व असल्याचं नमूद करत त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भूमिकेची तुलना दुधात साखरेसारखी केली.
“साखर चिमूटभरच लागते, पण ती दुधात टाकली की दूध गोड लागतं. ब्राह्मण समाजाचं काम हेच आहे – समाजात गोडवा निर्माण करणं,” असं त्यांनी सांगितलं.
सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन काम केल्यासच देशाचा विकास शक्य असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.










