चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण शहरात एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. क्रेडिट कार्ड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेली व्यक्ती विजय हरी बापट (वय ७२), राहणार परांजपे स्कीम, एफ-२, बहादूरशेख नाका, चिपळूण हे आहेत. १९ मार्च २०२५ रोजी फेसबुकवर ‘लाइफटाईम क्रेडिट कार्ड’ची एक आकर्षक जाहिरात त्यांना दिसली. त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक करून आपली वैयक्तिक व बँक संबंधित माहिती भरली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे २० मार्च रोजी, त्यांना दोन अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून कॉल आले.
फोन करणाऱ्या व्यक्तींनी बापट यांना क्रेडिट कार्ड पाहिजे असल्याचा सवाल केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बापट यांनी आपली एटीएम कार्डची सर्व माहिती दिली. यानंतर, त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातून सलग व्यवहार होऊ लागले. खात्री केल्यानंतर, त्यांच्या जॉइंट खाते, सेव्हिंग खाते व एफडीमधून एकूण ६ लाख रुपयांचा ऑनलाइन अपहार झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणी बापट यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक तपास करत असून नागरिकांनी सोशल मिडियावर येणाऱ्या फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









