मुंबई | प्रतिनिधी
ओबीसी नेते आणि सतत चर्चेत राहणारे लक्ष्मण हाके सध्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी कारण ठरली आहे त्यांच्या पत्नी विजया हाके यांची एक कथित ऑडिओ क्लिप, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये विजया हाके एका महिलेला फोनवरून शिवीगाळ करताना आणि धमकावताना ऐकू येत आहेत.
ही महिला म्हणजे हनुमंत धायगुडे यांची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. धायगुडे यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्यावर फेसबुकवर वक्तव्य करत सडकून टीका केली होती. त्यांनी हाके यांच्यावर “राखी सावंतसारखा टीआरपीसाठी काहीही करणारा” असा आरोप करत त्यांच्यावर सडेतोड टीका केली होती.
फोनवरून संताप: काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेशी अत्यंत कठोर आणि अपमानास्पद भाषेत बोलताना ऐकू येते. “मी त्याला चहा दिला, जेवण दिलं, कपडे दिले, साड्या दिल्या आणि आज तो कुत्र्यासारखा वागत आहे” अशी तीव्र टीका त्यात ऐकू येते. याशिवाय, “माझी जीभ काळी आहे, तो असाच मरेल” असे शब्द वापरून गंभीर इशारे दिल्याचेही स्पष्टपणे ऐकायला मिळते.पार्श्वभूमी: हाके विरुद्ध राष्ट्रवादी, हाके विरुद्ध धायगुडे
लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या निधीविषयी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर पलटवार करण्यात आला होता. आमदार अमोल मिटकरी यांनीही हाकेंना लक्ष्य करतून टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर, आता हाके यांच्या विरोधात त्यांच्या माजी कार्यकर्त्याने, हनुमंत धायगुडे यांनीही उघडपणे सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला. त्याला उत्तर देताना, विजया हाके यांचा संतप्त फोन गेल्याचे दिसून येते.
या कथित ऑडिओ क्लिपमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. काहींनी विजया हाके यांच्या आक्रमक प्रतिक्रियेचा निषेध केला आहे, तर काही जण हाके कुटुंबीयांच्या बाजूने भूमिका घेत आहेत.सदर ऑडिओ क्लिप तपासण्याची आणि सत्यता पडताळण्याची गरज आहे. संबंधित महिला किंवा हनुमंत धायगुडे यांच्याकडून अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचं वृत्त नाही. परंतु, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता, हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.










