पुणे | प्रतिनिधी
गृहोद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून तब्बल १६३४ महिलांकडून सुमारे ४२ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर व जयश्री हंगरगे-कोळेकर (रा. भेकराईनगर, हडपसर) या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ज्योती उत्तम बोरावके (वय ५२, रा. ससाणेनगर) यांनी तक्रार दिली असून, हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.
बनावट गृहोद्योगाच्या नावाने राबवला गंडा
कोळेकर दाम्पत्याने ‘खुशी महिला गृहोद्योग समूह’ या नावाने भेकराईनगर परिसरात एक बनावट संस्था सुरू केली. पेन्सिल पॅकिंग आणि गृहोपयोगी वस्तू तयार करण्याच्या उद्योगात महिलांना रोजगार दिला जाईल, असे सांगत त्यांनी महिला गटांमध्ये विश्वास निर्माण केला.
व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांनी गृहोद्योग समूहाचे सभासद व्हावे लागेल आणि त्यासाठी प्रत्येकी २०५० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यानंतर महिलांना रोज २०० रुपये मानधन, आठवड्यातून पाच दिवस काम दिले जाईल, असे आमिष दाखवण्यात आले.
शाखाप्रमुखांच्या माध्यमातून वसुली
फिर्यादी बोरावके यांच्यासह अन्य चार महिलांची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या शाखाप्रमुखांमार्फत महिलांकडून पैसे गोळा करण्यात आले. एकूण १६३४ महिलांकडून ४२,७९,७०० रुपये जमा करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम न देता संशयितांनी महिलांची फसवणूक केली आणि ते फरार झाले.
फसवणूक उघडकीस आल्यावर पोलिसांत धाव
काम सुरू झाले नाही आणि महिलांना मोबदला न मिळाल्यामुळे महिलांनी शाखाप्रमुखांकडे तगादा लावला. त्यानंतर बोरावके यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.









