पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठा खुलासा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. अर्जांच्या पडताळणीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने काही अपात्र लाभार्थींनाही या योजनेचा लाभ मिळाला, अशी कबुली त्यांनी दिली.
सिंचननगर येथे पुणे कृषी हॅकेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडे वेळ मर्यादित होता. त्या काळात निवडणुका होत्या. त्यामुळे निकष तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही सरकारी नोकरी करणाऱ्या, घरी चारचाकी असलेल्या आणि उत्पन्न निकषांबाहेर असलेल्या महिलांनाही लाभ मिळाला.“
ते पुढे म्हणाले की, “आता या लाभार्थ्यांची तपासणी करून अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाईल. मात्र, याआधी लाभ मिळालेल्यांकडून पैसे मागितले जाणार नाहीत.”
चूक मान्य, पण कारवाई नाही
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “ही चूक आम्ही मान्य करतो, मात्र लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर किंवा इतर कोणावर कारवाई केली जाणार नाही.” तसेच, “पुढील काळात फक्त पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकीय चर्चांवर टोलवाटोलवी
‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे दोन गट पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर मात्र अजित पवार यांनी कोणतेही उत्तर देणे टाळले. यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खलबली माजली आहे







