धारूर (जि. बीड) : केज राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अंगद लांडगे (वय २७, रा. पिसेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह पार पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगद लांडगे हे धारूर येथे एका दुकानाच्या उधारी वसुलीच्या कामानिमित्त आले होते. काम आटोपून घरी परतत असताना टोल नाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर लांडगे रस्त्यावर कोसळले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
दुचाकीस्वाराला तत्काळ अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, धारूर पोलिसांनी संबंधित टँकर ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.





