मराठी नववर्षाच्या उंबरठ्यावर अवकाळी पाऊस व गारपीट; आंबा व रब्बी पिके जमीनदोस्त, पंचनाम्याची मागणी?

बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी परिसरात अचानक आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे मराठी नववर्षाचा उत्साह सुरू असताना, दुसरीकडे निसर्गाच्या या अवकृपेने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारच्यां सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.

स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गारपीट इतकी तीव्र होती की उभ्या पिकांचे अक्षरशः नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांसोबतच आंबा पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडांवरील आंबे गारांच्या तडाख्यामुळे खाली पडले असून, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कापणीच्या टप्प्यावर आलेली पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याचे चित्र आहे. हवामान खात्यानेही या परिस्थितीबाबत इशारा दिला असून, अचानक तयार होणाऱ्या ढगांमुळे अशा प्रकारचे हवामान बदल होत असल्याचे सांगितले आहे. पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारच्या अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गप्पेवाडी परिसरातील अनेक शेतकरी आपले नुकसान पाहून हतबल झाले आहेत.

काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती, मात्र गारपीटीमुळे त्यांचे सर्व परिश्रम वाया गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेत नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने त्वरीत मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती हा व्यवसाय अधिकच धोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करून शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment