टीम इंडियाचा स्टार फिनिशर आणि विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह आणि उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा नुकताच लखनौमध्ये पार पडला. या खास प्रसंगी दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आणि त्यांच्या भावनिक क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
साखरपुडा लखनौमधील फाईव्ह स्टार हॉटेल ‘द सेंट्रम’ येथे पार पडला. या समारंभाला क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रवीण कुमार, पीयूष चावला, तसेच यूपी क्रिकेट टीमचा कॅप्टन आर्यन जुयाल, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, तसेच समाजातील महत्त्वाच्या व्यक्ती अशा अनेकांनी हा कार्यक्रम शोभिवंत केला.
या साखरपुड्यासाठी दोघांनी एकमेकासाठी खास अंगठ्या मागवलेल्या होत्या. रिंकूने प्रियासाठी मुंबईहून तर प्रियाने रिंकूसाठी कोलकाताहून खास डिझाईन केलेली अंगठी मागवली होती. या अंगठ्यांची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये आहे.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची ओळख
प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाची तरुण आणि प्रभावशाली खासदार आहेत. तर क्रिकेटच्या चाहत्यांना रिंकू सिंह ओळखण्याची गरज नाही; आयपीएलच्या 16 व्या हंगामात त्यांनी केकेआरकडून अंतिम ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता. रिंकूने भारतासाठी 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने 3 अर्धशतकांसह 549 धावा केल्या आहेत.









